Abstract : महाराष्ट्रात असहकाराचा कार्यक्रम अतिशय प्रभावीपणे राबविण्यात आला होता. खानदेशात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून स्वातंत्र्याचा लढा लढविण्यात आला. त्यात खानदेशाचे योगदान महत्वपूर्ण दिसून येते. ग्रामीण भागापर्यंत असहकार चळवळीचे लोण पसरलेले होते. असहकाराचा ऐतिहासिक ठराव महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर पारित झाल्यामुळे खानदेशात ऐक्य निर्माण झालेले होते. महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीच्या सुरूवातीला महाराष्ट्रात सर्वप्रथम भुसावळच्या अण्णासाहेब दास्ताने यांनी 1 फेब्रुवारी 1921 व अलीबागच्या माधवराव गोसावी या दोन वकीलांनी वकीलीचा कायमचा त्याग केलेला होता. 1
असहयोग आंदोलनात स्वदेशी, सरकारी शाळांवर बहिष्कार कोर्टावर बहिष्कार, राष्ट्रीय शाळांची निर्मिती, मद्यपान निषेध, विदेशी कापडावर बहिष्कार व विदेशी कापडाची होळी खादीचा प्रचार इ. अनेक कार्यक्रमाला खानदेशातून चांगला प्रतिसाद मिळालेला होता. जळगाव येथील श्री. देवकीनंदन नारायण यांनी कॉलेज सोडून काँग्रेसच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतले तसेच एरंडोल येथील श्री शंकरभाऊ काबरे यांनी ही कॉलेज सोडून काँग्रेस चळवळीत सहभाग घेतला. 2
महाराष्ट्रात गांधीजींचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी दास्तानेंनी व शंकरराव देवांबरोबर दौरा केला आणि प्रचाराचे माध्यम म्हणून सत्याग्रही नामक नियतकालिका सुरू केली. राष्ट्रीय शाळा स्थापनेच्या कार्यक्रमानुसार जळगाव, भुसावळ, अमळनेरला राष्ट्रीय शाळा सुरू करण्यात आल्या.3